अजिंक्य शाहीर यांचे योगदान...
शाहीर अजिंक्य सुरेश लिंगायत हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक व्यक्तिमत्व आहेत. ते सध्या लोककला अध्यासन केंद्र, गारवारे कम्युनिटी सेंटर, छत्रपती संभाजीनगर येथे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत, महाराष्ट्र राज्य शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंचाचे ते सचिव आहेत. तसेच लोककला प्रशिक्षक, लोककला अभ्यासक तथा लोककला प्रशिक्षण अभ्यासक्रम समन्वयक म्हणून ते लोककला क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. विविध कार्यक्षेत्रात देत असलेल्या योगदानामुळे ते एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व ठरले आहेत.
शिक्षण :-
शाहीर अजिंक्य सुरेश लिंगायत यांचे शिक्षण १ ली ते १० वी पर्यंत पुण्यामध्ये झाले. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विज्ञान शाखेतून ११ वी आणि १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे डी. टी. एड. (शिक्षक प्रशिक्षण) आणि बी.ए. ची पदवी मिळवली. याशिवाय, छत्रपती संभाजीनगर येथेच त्यांनी लोककला पदविका पूर्ण केली. पुढे, त्यांनी पुण्यातून एम.एस.डब्ल्यू. (मास्टर ऑफ सोशल वर्क) ही पदवी प्राप्त केलेली आहे.
शाहीर अजिंक्य यांची शाहिरीची परंपरा...
शाहीर अजिंक्य लिंगायत यांची कलेतील तिसरी पिढी आहे. यांचे पणजोबा स्व.श्री. काशिनाथराव तावरे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत तबलावादनासाठी साथसंगत करत होते. यानंतर यांचे आजोबा शाहीर अंबादास तावरे यांनी प्रशासकीय अधिकारी चे पद भूषवित शाहिरीच्या प्रचार – प्रसार आणि प्रशिक्षणार्थ शाहीर महर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंचाची स्थापना करून नवीन कलावंत तयार व्हावा या हेतूने आयुष्यभर महनीय निःस्वार्थ कार्य करत आहे. यासोबत शाहीरांच्या वडिलांचे वडील (आजोबा) हे कुष्ठरोगाचे डॉक्टर होते, व उत्तम असा चौघडा वाजवीत होते. आणि यांच्या पुढची पिढी म्हणून शाहीर अजिंक्य लिंगायत हे नवीन लोककलावंत नवा शाहीर तयार झाला पाहिजे, या हेतूने लोककलेच्या संगोपन – संवर्धन आणि प्रशिक्षणाचे महनीय कार्य करीत आहे.
उल्लेखनीय कामगिरी...
आपल्या महाराष्ट्रातील मातीतल्या भाषेने आणि लोककलेने आपली संस्कृती, अस्मिता व परंपरा टिकवलेली आहे, आणि आज आपण आधुनिक युगाकडे वाटचाल करीत असताना आपण आपली संस्कृती, अस्मिता परंपरा व लोककला ही विसरत चाललेलो आहोत. म्हणून आपली संस्कृती, अस्मिता व परंपरा टिकविण्यासाठी लोककलेचे संगोपन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. याकरिता शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच आणि लोककला अध्यासन केंद्र, गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या माध्यमातून शाहीर अजिंक्य गेल्या १४ वर्षापासून सर्वसामान्य होतकरू मुलांना लोककलेचे प्रशिक्षण देत नवीन लोककलावंत निर्मितीचे कार्य करत आहे. या मंचाच्या आणि लोककला प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोककलेचे प्रशिक्षण – संगोपन आणि संवर्धनाचे कार्य सुरू असताना, यातून बाल, युवा, प्रौढ व तसेच होतकरू विद्यार्थी लोककलेचे पारंपारिक, शास्त्रोक्त आणि आधुनिक शिक्षण घेत आहे. आजतागायत प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी टीव्ही चैनल, आकाशवाणी, रेडिओ एफएम सारख्या प्रसारमाध्यमाच्या पडद्यावर झळकले आहे. UNISEF सारख्या विश्वस्तरिय सामाजिक संस्थेपर्यंत रुबेला लसीकरणाच्या पोवड्याच्या माध्यमातून आपल्या लोककलेचा डंका यांनी वाजवला आहे, स्वराज्याची राजधानी दुर्गराज किल्ले रायगड पासून ते दिल्ली, बेंगलोर, गोवा सारख्या वेगवेगळ्या राज्यात आपल्या लोककलेचे प्रदर्शन केले आहे, भारताच्या G20 च्या प्रसंगी भारतीय G20 चा पोवाडा सादर केला आहे, कोरोनाच्या भीषण काळात औरंगाबाद महानगरपालिकेला आणि आयुक्तालय कार्यालयाला हिंदी, मराठी आणि कव्वाली सारखे गाणे देऊन सर्व नागरिकांना ऑनलाईन व पोलीस व्हॅनच्या माध्यमातून कोरोना बाबत जागरूक केले आहे. तसेच भारतीय सैन्यासाठी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले आहे. यासोबतच यातील विद्यार्थी विविध महोत्सव, सामाजिक, राजकीय, शासकीय कार्यक्रम आणि वेगवेगळ्या स्पर्धा, यासारख्या व्यावसायिक कला कसोटीस पात्र ठरले असून, आज महाराष्ट्रासोबत भारतभर आपल्या महाराष्ट्राच्या लोककलेची पताका फडकवीत आहेत आणि रोजगार मिळवीत उदरनिर्वाह करीत आहेत. याच प्रशिक्षण वर्गातील तीन विद्यार्थ्यांना देशातल्या चारशे जणांमधून केंद्र सरकारची एक लाख वीस हजाराची शिष्यवृत्ती देखील मागील तीन वर्षांमध्ये प्राप्त झालेली आहे. अशा या अध्यासन केंद्रातून अनेक विद्यार्थी आपली लोककला शिकत, भविष्यवेधक सांस्कृतिक पाऊल टाकत आहे. यासोबतच मंचाच्या माध्यमातून लोककला प्रशिक्षण शिबिर, लोककला प्रशिक्षण कार्यशाळा, लोककलावंत मेळावे, बालशाहीर पुरस्कार, राज्यस्तरीय शाहिरी, पोवाडे व गीत लेखन स्पर्धा, राज्यस्तरीय शाहीरी गायन स्पर्धा, ढोलकी वादन प्रशिक्षण शिबिर, महिलांसाठी शाहिरी प्रशिक्षण शिबीर, फेसबुक ऑनलाईन राज्यस्तरीय युवा व महिला शाहिरांची मालिका, लोकशाहीर आपल्या भेटीला…मालिका पर्व तसेच विविध शाहिरी व लोकसाहित्य प्रकाशित करत विविध सांस्कृतिक उपक्रम राबवित लोककलेच्या संगोपन आणि संवर्धनार्थ कार्य करित आहे. तरी हे लोककलेचे आणि ज्ञानदानाचे महनीय कार्य दिवसेंदिवस पुढे भविष्यात वृद्धिंगत होण्यासाठी आणि पुढे येणाऱ्या आपल्या भावी पिढीला लोककलेची, आपल्या संस्कृतीची व आपल्या अस्मितेची माहिती मिळावी, त्याचे जतन व्हावे आणि ही आपली अस्सल लोककला परंपरा निरंतर, चिरंतर टिकून राहावी म्हणून अध्ययन आणि अध्यापनाच्या माध्यमातून सध्या आम्ही लोककला अभ्यासक्रम समन्वयकाचे देखील कार्य करित आहोत. या माध्यमातून नवनवीन लोककला अध्यासन केंद्र, प्रशिक्षण वर्ग, शिकवणी केंद्र सुरू झाले पाहिजे, विविध व्यवसाय अभ्यासक्रम शिक्षणामध्ये आपल्या लोककलेच्या शिक्षणाचा सहभाग झाला पाहिजे, या दृष्ट्या सामाजिक प्रचार – प्रसारार्थ देखील महनीय कार्य करीत आहोत.
सांस्कृतिक कलाविष्कार...
पर्यावरणसंबंधी कार्यक्रम, निसर्ग वाचवा मोहीम कार्यक्रम, गडकिल्ल्यांचा इतिहास, कॉर्पोरेट कार्यक्रम, पर्यटन कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, विविध महापुरुष जयंती व पुण्यतिथि कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, दिनविशेष कार्यक्रम, टिव्ही शो कार्यक्रम, प्रासंगिक लोकसंगीत ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि शुटींग, ई. साठी विविध संगीत- नृत्य – नाट्य सांस्कृतिक कार्यक्रम.
संपूर्ण भारतभर अंदाजे 1500 च्या वर शाहिरी, लोककला, नृत्य व नाट्य संगीताचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आहे.